गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील विकासाबद्दल गौरव
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकारी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा कै. विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथील गोखले इन्स्टिट्यूटमधील भव्य अशा गुरूदक्षिणा सभागृहात या देखण्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या न्यू ड्राफ्ट पॉलिसीचे चेअरमन तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, तसेच महाराष्ट्र राज्य बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकुर, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर व संचालक, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरशेनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, सहकार भारतीच्या अध्यक्ष डॉ. शशी अहिरे, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार तसेच महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्हिडीओ संदेशातून आपल्या भावना व्यक्त करत अरविंद पोरेड्डीवार यांचे अभिनंदन केले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना अरविंद पोरेड्डीवार यांनी सहकार क्षेत्रातील आपले अनुभव सांगितले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांत जिल्हा सहकारी बँकेला यशाच्या शिखरावर पोहोचवताना अनेक अडचणींवर मात करावी लागली. या यशात बँकेशी निगडीत सर्व घटकांचे योगदान असल्याचे सांगत पोरेड्डीवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.