राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यातही वेगवान पुढाकार घेतला असून डिजिटल क्षेत्रात भरारी घेताना बँकेने आपले ग्राहक व व्यावसायिकांसाठी क्यूआर कोडची सुविधा आणली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची सुविधा असलेली ही राज्यातील पहिलीच बँक आहे. नेहमीच नक्षलग्रस्त, मागास, अविकसित म्हणून हिणवल्या जाणार्या गडचिरोली जिल्ह्यातील या बँकेने घेतलेली ही भरारी संपूर्ण राज्यातच कौतुकाचा विषय ठरली आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते मंगळवार (ता. 5) बँकेच्या सभागृहात या अभिनव उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पोरेड्डिवार, उपाध्यक्ष श्रीहरि भंडारीवार, मानद सचिन अनंत साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.