जिल्ह्यामध्ये डिजिटल बँकिंग करिता विविध समस्या असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विविध डिजीटल बँकिंग सुविधा ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ईतर जिल्हा बँकांमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रेसर बँक म्हणुन काम करीत आहे असे प्रतिपादन नाबार्डचे पुणे येथील मुख्य महाप्रबंधक गोवर्धन सिंह रावत यांनी केले.
नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रिय कार्यालय, पुणे तर्फे आयोजित बँकांच्या वरिष्ठ अधिकारी व शाखा व्यवस्थापक यांच्या कार्यशाळेला मुख्य अतिथी म्हणुन मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रिय कार्यालय, पुणे तर्फे जिल्ह्यातील आर्थीक समावेशन व विविध व्यवसायाकरिता जिल्ह्यात कर्जवाटपाकरीता असलेला वाव लक्षात घेता केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध योजना या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा बँकांचे वरिष्ठ अधिकारी व शाखा व्यवस्थापक यांच्याकरिता बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.