‘बँको ब्ल्यू रिबन’ ने सन्मानित; दमण येथील सोहळ्यात प्रंचित पोरेड्डीवार यांच्यासह टिमचा गौरव
देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणान्या जिल्हा सहकारी बँकांना बँकोतर्फे २०२२-२३ या वर्षाचा बँको ब्ल्यु रिबन २०२३ प्रथम पुरस्कार दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच दमण येथील विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे अतिदुर्गम, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील या बँकेने सलग आठव्यांदा या पुरस्कारावर आपली नाममुद्रा कोरली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे थोड्या थोडक्या नव्हे तर देशातील तब्बल ३७० बँकांमधून दी गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक पी. के. अरोरा यांच्या हस्ते दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी हा पुरस्कार स्विकारला. गुरुवार (ता. ५) दमण येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते. देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांमधून रिझर्व बँकेच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्टपणे काम करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दरवर्षी बँको पुरस्कार दिला जातो.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात ठेव वृद्धी तसेच रिझर्व बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार एन.पी.ए. चे प्रमाण, सी. आर. ए. आर. आदी निकषांत बँक पात्र झाली असून ३१ मार्च २०२३ च्या आर्थिक स्थितीवर बँकेचे ग्रॉस एन.पी.ए. १.१३ टक्के आहे. बँकेने आर्थीक निकषात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बँको समितीने राष्ट्रीय स्तरावरच्या २०२३ या वर्षाच्या बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानीत केलेले आहे. हा पुरस्कार बँको पुणेतर्फे बँको ब्ल्यु रिबन २०२३ प्रथम पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला, याचे श्रेय बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, पदाधिकारी व संचालक यांनी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला बचतगटांचे सदस्य व हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेला हे यश प्राप्त करता आले, असे बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार यांनी सांगीतले.